पोलिसांमुळे सुखरूप सुटका घरची परिस्थिती आहे जेमतेम
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) घरची धुणीभांडी करण्याच्या किरकोळ कारणावरून घरचे रागावल्यामुळे राग अनावर झालेल्या एका १४ वर्षीय मुलीने आपल्या मामाच्या मुलीला सोबत घेऊन थेट घरच सोडल्याची घटना चिकलठाणा परिसरात मंगळवारी (दि. १९) सकाळी घडली.
घर सोडल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या या दोघींनी रात्रीच्या वेळी एका मंदिराच्या परिसरात आश्रय घेतला होता. दरम्यान, मुली बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. चिकलठाणा पोलिसांनी तत्परता दाखवत बुधवारी (दि. २०) चौधरी कॉलनी परिसरातून दोन्ही
अल्पवयीन मुलींना सुखरूप शोधून काढले.
पोलिसांच्या माहितीनुसार, घरातील काम का करत नाही या कारणावरून रागावलेल्या आईने दोन चापटा मारल्या. यामुळे रागावल्याने १४ वर्षीय मुलीने मंगळवारी मामाच्या मुलीला सोबत घेत थेट घरच सोडले. अंगावरचे कपडे आणि बॅगा एवढेच साहित्य घेऊन त्या निघाल्या. संध्याकाळ झाली तरी मुली घरी परतल्या नाहीत. रात्रभर मुलींच्या आईंचा आक्रोश सुरू होता. त्यानंतर कुटुंबीय पोलिस ठाण्यात पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी सिडको पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला.
कुटुंबियांच्या स्वाधीन
चौधरी कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी अतिक्रमण बंदोबस्तासाठी उपनिरीक्षक विष्णू मुंढे पथकासह आले. त्याचवेळी मुलींचे आई-वडीलही परिसरात त्यांचा शोध घेत होते. दोन्ही मुली दिसताच आईने त्यांना मिठी मारली. पोलिसांनी दोन्ही मुलींची विचारपूस केली, त्यानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














